पहिलीतल्या लहान मुलांची शाळा सकाळी का असते असे प्रश्न स्वाभाविक आहे. मी सकाळी डोळे चोळत का ऊठायचो? कुलाबा, चर्चगेट मध्ये काम करणारे आई-वडिल घराजवळची शाळा बरी असा विचार करायचे. मग सकाळी पावणे-सात ला अर्धवट आंधारात, थंडीत, पावसात माझी आणि बाबांची वरात निघायची. कधी-कधी भागशाळेतल्या मैदानामध्ये पाऊस नसतानासुद्धा पाणी (दव) कसं, रेडियोमधून आवाज कसा येतो, पाण्याच्या पंपाची मोटार फिरते म्हणजे काय आणि पाणी वरच्या टाकीत कसं जातं अश्या एक ना अनेक गोष्टी चालायच्या.
घरी परत आल्यावर आजी बरोबर नको-नको त्या वयात रडियोवर वनिता मंडळ सारखे कार्यक्रम का ऎकले ते मला महित नाही. मग आनंदी-गोपाळच अभिवाचन, लक्ष्मीबाई टिळकांच्या स्म्रुतीचित्रेच अभिवाचन, कामगारांचे प्रश्न (तेंव्हा गिरणी-कामगारांचा संप चालू होता), पावसाळ्यात किंवा ऊन्हाळ्यात होणारे सामान्य रोग वगैरेंनी माझ्या सामान्यग्यानात खूपच भर पडली. मग आजीची एक डुलकी व्हायची तेंव्हा रेडियोला जरा आराम मिळायचा. दुपारी चहा-दूधाची वेळ व्हायची तेंव्हा किती वाजले हा प्रश्न यायचा. गजर लावल्यासरखी आजी उठायची. रोज मी न चूकता छोटा काटा तीनजवळ आणि मोठा काटा आठवर अशी वेळ सांगायचो. दुपारी पावणेतीनला प्रदेशिक वार्तापत्र, दोन-पन्नासला संथगती ईंग्रजी बातमीपत्र असे कार्यक्रम रेडियोवर चालू व्हायचे. पण वेळ मात्र रोज तशीच. अजून शाळेत घड्याळ शिकवले नव्हते आणि रोज वेळ सांगून सुद्धा घड्याळ शिकायची माझी ईच्छा झाली नव्हती!
मग एक दिवस गम्मत झाली. शनिवारी बाबा घरी होते. सकाळभर सावंतकाका, पाटिलकाका, आण्णाकाका आश्या बाबांच्या मित्रांची वर्दळ झाली होती. दुपारी विश्रांतीसाठी बाबा जरा झोपले होते आणि माझ्या ऊगाचच काहीतरी टिवल्या-बावल्या चालू होत्या. त्यामुळे बहुदा बाबांची झोपमोड झाली होती. किती वाजले या प्रश्नाला ऊत्तर म्हणून मी काट्यांची पोझिशन सांगून मोकळा झालो. झोप मोड झाल्यामुळे नाहीतर रागानी बाबांचे डोळे लाल झालेत हे मला समजल नाही. आता एक थप्पड बसणार या आविर्भावात बाबा ऊठले...पण आजी मध्ये पडली.
मग एका जुन्या वहीच्या पुट्ठ्याचा एक गोल कापला गेला, १ ते १२ च्या पोझिशन्स लिहिल्या गेल्या, दोन पुट्ठ्याच्या तुकड्यांचे काटे बनले...आणि मग माझ्या घड्याळ शिक्षणाची सुरुवाता झाली, ओरडा खाऊन झाला. आता माझ्या बाबांची मनिषा माझ्या भाच्याला घड्याळ शिकवायची. त्याचीही घड्याळ सांगायची पद्धत काट्यांच्या पोझिशन प्रमाणेच आहे. "आहो तो लहान आहे अजून" असं मी सांगून बघितले, पण एकनाएक दिवस तोही घड्याळ शिकेल, कदाचित थोडा ओरडाही खाईल.
अजूनही माझा कधी-कधी वेळेचा गोंधळ होतो. मग आठवते ती दूपार - घड्याळ शिकलेली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment