फार वर्षांपुर्वी स्टार ट्रेक ची सुरुवात धीर गंभीर आवाजात होत असे - टू गो व्हेअर नो मॅन हॅज गॉन. मग कोणी चहाटळ लोकांनी त्याची "हं, म्हणजे बायकांची बाथरूम ना" असं म्हणून हेटाळणी केली होती. म्हणजे कॅप्टन कर्क च्या पंखात बळ यायच्या आतच त्यातली हवा काढून घेतली. आज मी तसाच एक प्रयत्न करून बघणार आहे. टू गो व्हेअर नो मॅन...नाही हं, तस काही मनात आणू नका. बायकांची बाथरूम म्हणून चार जोडे खायाची माझी ईच्छा नाही!
ई, मी, झी वगैरे अक्षरं घेवून टीव्ही चॅनल्स सुरु झाले आणि बघता बघता या नविन जगाची सुरुवात झाली. कॉलेज मध्ये असताना चुकून कधी एमटीव्ही चा धांगडधींगा लावला तर आमच्या वेळी असं काही नव्हत हे ऐकवलं जायाच. पण एकच एक दूरदर्शन चा जमाना जाऊन केबल आलं आणि एक नविन जग सुरु झालं. संध्याकाळी ६ ते रात्री १० मालिकांच गुर्हाळ सुरु झालं आणि सहाजिकच नो मॅन्स् वर्ल्ड सुरु झालं.
श्वेतांबरा दूरदर्शन वर होवून गेली...पण नंतर डेली सोप नी आगदी तोंडाला फेस आणलाय. नावं तरी काय काय तर म्हणे आभाळमाया, वादळवाट, सोनियाचा ऊंबरा वगैरे. आणि स्टोरी काय तर बदला, गॉडी मेकप, थॊडा आणखिन बदला. आणि हे कमी पडत म्हणून लांबण लावणे हा जोडधंदा.
संवाद इतके उत्क्रुष्ट की ह्यांनी फक्त ग्यानपीठाच्या चपत्या खाव्या. हे एक उदाहरण बघा. एक रिकामा हॉल. जोरजोरात बेल वाजते. मग एक पोक्त बाई, पदरानी कपाळाला न आलेला घाम पुसत आले आले करत बाहेर येते आणि दार उघडते. दारात एक टीशर्ट मधून मसल्स बाहेर येत असलेला हसतमुख तरूण. मग ह्या काकू-पुतण्याचे एकमेकांकडे बघून स्मितहास्य. ह्यात बरच म्युझिक. "अरे, ये, ये...ऊन्हाचा आलास एवढा" म्हणत काकू स्वागत करते आणि आत पाणी आणायला निघून जाते. पुतण्या तोवर एक मासिक चाळतो. पाण्याचा ग्लास भरून काकू परत बाहेर येते. मग त्या दोघात पुन्हा स्मितहास्य. पुतण्या घटाघट पाणी पीतो. "थांब हं, चहा ठेवते" - काकू. "नको नको मी आत्तच जेवून आलो" - पुतण्या. चहाला नाही म्हणलं तर पाप लागत ही शिकवण पुतण्या विसरलेला दिसतो. बरं इतक जर ऊन मी म्हणतय, तर काकूनी तरी लिंबू सरबत विचारावं ना...ते नाही. एवढ्यात ब्रेकची वेळ होते.
आता मला सांगा, चार स्मितहास्ये, एक ग्लास पाणी आणि आर्धा थेंब घाम या मध्ये कथानक कुठे गेलं?
कथानक कधी जर पुढे सरकलच तर कशी गम्मत येते बघा. अधुरी म्हणता म्हणता पुरी न होणाऱ्या कहाणीतला नायक मरतो. त्याला अगदी अग्नी बिग्नी दिला जातो...तर पुढच्या चौथ्या भागात हा परत जिवंत. तोही जश्याचातसा! म्हणजे पुनर्जन्मावर किती हा अगाढ विश्वास? बरं त्याहूनही जास्त विश्वास प्लॅस्टीक सर्जरीवर. इतका की सर्जरी झालेली व्यक्ती नुसतीच चांगली नाही दिसत तर तिची ऊंची सुध्दा वाढलेली असते! एका मलिकेत काय तर म्हणे गाडीला अपघात होतो आणि गाडी चालवणारी महिला माहिमच्या खाडीमध्ये पडते. तिच्यावर लगेच प्लॅस्टिक सर्जरी. का, तर म्हणे माशांनी तिचा चेहरा खल्ला. आता महिमच्या खाडीमध्ये मासे असते तर मुंबईतल्या तमाम जनतेनी ते शिल्लक ठेवले असते का?
जसं प्लॅस्टीक सर्जरीच तसचं लफड्यांच. ह्याचं तिच्या बरोबर, तिचं आणि कुणा बरोबर...एक ना अनेक. मला अजूनही आठवतं, स्टार मूव्हीज वर वगैरे Pretty Woman किंवा Top Gun मध्ये तसले ’सीन’ आले की आम्ही पटकन चॅनल बदलत असू. पण अलिकडचे हे मालिकावाले...शीव, शीव. आमची बयको लग्नाच्यावेळी नुसतीच वधू झाली. ईथे टीव्हीत मुली कुलवधू कश्या होतात ते बघण्यासाठी मी एक मलिका बघू लागलो. बदला आणि कुंभांडां मधून वेळात वेळ काढून हिरो-हिरॉईन चक्क एका हॉटेलात जातात. राजे शिर्के देशमुखांची पोर पळवतात. मला मात्र यात आईला एम्बॅरॅस करण्याची संधी सापडते - हे प्री मरायटल की झालं यांच लग्न? असा प्रश्न मी विचारून टाकतो. ऊत्तरा दाखल एक जळजळीत कटाक्ष मिळतो. बरं सगळं करून सवरून झालं की यांच्या पोटातली पोरं दहा-दहा महिने बाहेरच येत नाहीत. मलाच काळजी लागून रहाते. रोज ऑफिस मधून परत आल्यावर मी विचारायचो अजूनतिकेचं काय झालं?
दुसरीकडे वेगळाच प्रकार. एक दिवस नट्टा-पट्टा करून रेशम टिपणीस दादांकडे येते. हे दादा म्हणे रोज दत्त महाराजांशी बोलायचे. तर हिनी दादांना काय विचारावं? दादा, मला आई व्हायचंय. म्हणजे घरी धडधाकट नवरा असताना, दादांनी काय करावं अशी या पात्राची अपेक्षा होती? स्पर्म डोनेशन?
आता तुम्ही म्हाणाल घरचेच होऊन जातात हे लोकं...पण किती? एक किस्सा सांगतो. एकदा गणपतीमध्ये माझ्या मावशीकडे गेलो होतो. माझा मावसभाऊ आणि त्याची बायको दोघेही मिडियावाले. एक अनोळखी माणूस, मिडियावाला तिकडे आला होता. सगळ्यांची चर्चा चालू होती मुक्ता नी हे केलं, ते केलं, तिचं असं झालं, तसं झालं वगैरे. मला प्रश्न पडला, ही मुक्ता कोण? एखादी कझिन मला न सांगताच लहानाची मोठी झाली की काय? पण विचारायचं कोणाला? नंतर मला कळलं की मुक्तानी सागरशी लग्न केलं. म्हणजे आपल्याला आमंत्रण नाही आलं असा प्रश्न मी आईला विचारणार तरी आपली गहन चर्चा चालूच. नंतर कळल की मुक्ता, सागर कुठल्यातरी मालिकेतली पात्र आहेत.
बदला घ्यायचा म्हणजे किती घ्यायचा? एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी...पण पुनर्जन्म? तेही होतं पण बदला संपत नाही. आधी सासू-सून, मग त्यांची पोरं, मग त्यांची पोरं...ह्यात सासूचं वय मात्र पहील्याभागात जितकं तितकंच हजाराव्या भागातही. मग पुनर्जन्माची काय गरज? तरीही पुनर्जन्म होतात. आणि निव्वळ योगायोग समजून सोडून द्यायच असं हे मालिकावालेच सांगतात. आता बोला?
ह्यांचे सण-बीण पण मजेशीर असतात. सण समारंभामध्ये दीवाळीच्या आंघोळी पासून सगळ. मग पाडवा, दसरा, गणपती हे तर सोडाच, पण अगदी मंगळागौर सुद्धा. एक मात्र आहे की सावीत्रीबाई फुल्यांचा वारसा सांगत ह्या मंगळागौरीला एक विधवा आणि एक परित्यक्ता यांना पण बोलावण आलं होत. एवढाचं काय तो यांचा सामाजिक संदर्भ.
आणि रहाणीमान? घरातच चांगले कपडे, मेकप, छान साडी, ऊंच टाचेचे बूट वगैरे घालून कधी माझी आई, काकी, आत्या का नाही स्वयंपाक करत? आमच्या सारखा, कधी यांच्या घरात पसारा का नसतो?
बरं मालिका सोडून दुसरं काही बघावं तर तिथे नुसताच टाळ्यांचा कडकडाट. तरी मराठी चॅनलवाल्यांची चलती झाल्या पासून आमच्या घरात हिंदी हद्दपार झालय. तिथे काय चालतं याची कल्पनाच न केलेली बरी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
i just read the first word.. and scrolled down for the comments.. :)..
the best rread ever !
wats keeping you v busy ? No bloggin these days ?
maalinkanchya gaavi jaaon aalo, pan navin post kuthe aahe?
Post a Comment